अवकाळी पावसाच्या दृष्टीने एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आणखी चार दिवस अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यात आज महाराष्ट्रातील काही भागांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब दिलासा देणारी आणि बागायतदार शेतकऱ्यांची काहीशी चिंता वाढवणारी आहे.
महाराष्ट्रात यलो अलर्ट
आज विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकसह नाशिकचा घाट परिसर, पुणे शहर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत देखील पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपीट होण्याची शक्यता या भागात आहे. त्यामुळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दिवसभर कमालीचा उकाडा जाणवतो आणि सायंकाळच्या सुमारास पाऊस जोरदार बरसतो अशी स्थिती पहायला मिळत आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला आहे.
अवकाळी पावसाने बागायती क्षेत्राचं नुकसान
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच भागांत अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसासोबत गारपीट देखील झाली होती. द्राक्षे, आंबा, केळी बागांचं या काळात मोठं नुकसान झालं. या नुकसानीचे पंचमाने करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. परंतु अद्याप त्या मागणीला तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आणखी अवकाळी पाऊस कोसळल्यास या नुकसानीत वाढ होणार आहे.