Gokhale Bridge – मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील अंधेरी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मात्र आता या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. कारण अंधेरीतील प्रसिद्ध गोखले पूलाच्या दुसऱ्या भागाचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. हा अलिकडच्या काळात बीएमसीचा सर्वात जलद पूर्ण झालेला प्रकल्प आहे, बंद झाल्यापासून २८ महिन्यांच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पुल- एक यशाची गाथा…
हा पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक आहे. त्यामुळे पुल- एक यशाची गाथा असे पुस्तक आमदार साटम यांनी लिहावे. असं मंत्री आशिष शेलार म्हणाले. या पूलाचे काम म्हणजे एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. हा बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी असल्याचे आमदार अमित साटम म्हणाले.

पूलाचे काम का केले?
दरम्यान, जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. यानंतर या पूलाचे काम व्हावे, अशी लोकांची मागणी होती. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आले होते. त्यामुळं या पूलाचे काम हाती घेण्यात आले. पूलाच्या कामासाठी एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली होती.
किती कालावधीत काम पूर्ण
बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबानंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२१ मध्ये कामाला सुरुवात झाली. गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू पूर्ण करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. अशी माहिती आमदार अमित साटम यांनी दिलेय. गोखले पुलासारखे विक्रमी काम भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर होण्याकरता मुंबईकरांना आशीर्वादाची साद आमदार साटम यांनी यावेळी घातली.