गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, जिल्ह्यातून चांगले अधिकारी घडावेत व समृद्धी निर्माण व्हावी, हा या प्रकल्पामागील हेतू आहे. गोमाता संवर्धन करून जिल्ह्यातील तरुणांनी शेतीपूरक उद्योगात सहभागी व्हावे

Govardhan Gaushala Konkan : गोवर्धन गोशाळा कोकण हा प्रकल्प कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आला असून, गावाच्या विकासासाठी गोमातेचे योगदान केंद्रस्थानी ठेवण्याचा संकल्प या प्रकल्पामागे आहे. गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजे–साटमवाडी (ता. कणकवली) येथे ७० एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिशादर्शक आणि मार्गदर्शक

दरम्यान, कोकणात धवल क्रांतीचा पाया घातला जात असून, परिसरातील दूधही येथे संकलित केले जाणार आहे. त्यामुळे दूध व्यवसायालाही चालना मिळेल. हा उपक्रम गोमाता संवर्धनासाठीचा मॉडेल प्रकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिशादर्शक तसेच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गोमाता संवर्धन करून जिल्ह्यातील तरुणांनी शेतीपूरक उद्योगात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारतीय संस्कृतीत गोमातेचे महत्त्व फार मोठे

दुसरीकडे गोशाळा म्हणजे केवळ गायींचे संरक्षण नव्हे, तर ती एक सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक क्रांती आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न असून, अशा प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार, शाश्वत शेती आणि नैसर्गिक जीवनशैलीची दिशा मिळेल. तसेच गावाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन केंद्रे आणि कृषी व पशुसंवर्धनाचे पर्यटन केंद्र म्हणून देखील येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गोमातेचे महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत फार मोठे आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News