इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयद्वारे मे 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी काहींना यामुळे तणाव देखील होणार आहे. भारत- पाक युध्दाच्या पार्श्वभूमीवर हा तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे यामागे असणारं महत्वाचं कारण सांगितलं जात आहे.
परीक्षा पुढे ढकलली, नव्या तारखा कधी?
देशातील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 ते 14 मे दरम्यान आयोजित होणाऱ्या इंटरमिजिएट, अंतिम आणि पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे.

ICAI ने विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल असे कळवले आहे. तसेच सर्वांनी वेळोवेळी अपडेट पाहावेत आणि नवीन तारखांनुसार आपली तयारी चालू ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक तयारीसाठी वेळ मिळाला असला तरी, अभ्यास सुरू ठेवण्यासाठी मानसिक स्थैर्य आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या काळात योग्य मार्गदर्शन देणे गरजेचे आहे.
सीए परीक्षेचं महत्व मोठं
भारतामध्ये सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा ही एक अत्यंत प्रतिष्ठित व कठीण परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेसाठी अर्ज करतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते – फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. परीक्षेची कठोरता, विस्तृत अभ्यासक्रम आणि वेळेचे नियोजन हे यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामीण भागातही आता विद्यार्थ्यांचा कल सीएकडे वाढलेला दिसतो. कोचिंग क्लासेस, ऑनलाइन शिक्षण सुविधा आणि मार्गदर्शन यामुळे अधिकाधिक विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत. भारतात सीए व्यावसायिकांची मागणी सातत्याने वाढत असून, हे क्षेत्र उज्ज्वल भवितव्य प्रदान करणारे मानले जाते.