आसाम : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या सर्वच स्तरातून निषेध करण्यात येतो आहे. मात्र, या हल्ल्यावर संशय व्यक्त करत आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे आमदार हाजी अमीनुल इस्लाम याने हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा कट असल्याचे म्हटले होते. तसेच या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
हाजी अमीनुल इस्लाम याने केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (मंगळवारी) आसाम पोलिसांनी करावाई करत इस्लाम याला अटक केली. आता त्याला काय शिक्षा होणार याची उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान,भाजपने हाजी अमीनुल इस्लाम याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत टीका केली होती.

अमीनुल इस्लाम नेमके काय म्हणाला?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हाजी अमीनुल इस्लाम याने या हल्ल्यावर संशय व्यक्त करताना म्हटले की, पुलामामध्ये जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला होता आणि आता पहलगामध्ये 26 पर्यटकांची हत्या झाली हा सरकारी कट आहे. निष्पक्षपणे याची चौकशी केली नाही तर हिंदू-मुस्लीम राजकारण करणाऱ्यांचा हेतू सफल होईल. आम्ही समजू की हा हल्ला अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्या कटाचा भाग होता.
16 जणांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हाजी अमीनुल इस्लाम प्रमाणे काही जणांकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार हाजी अमीनुल इस्लाम याच्यासह आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तब्बल 16 जणांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानला कायमचा धडा मिळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थिती होते. त्यामुळे ही बैठक म्हणजे युद्धाचे दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. पाकिस्तानचे भारताने आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्यानंतर युद्ध झाल्यानंतर पाकिस्ताना उद्धवस्त होईल. त्यामुळे भारत पाकिस्तानाला कायमचा धडा शिकवेल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.