शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात लवकरच येणार , सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची माहिती

मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे. अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई – आणखी एक ऐतिहासिक वस्तू परदेशातून आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे. अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त काल अचानक येऊन महाराष्ट्रात धडकले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले. यानंतर लिलावत ही तलवार मिळविण्यात आले. अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.

सुमारे 47.15 लाख रुपये खर्च…

दरम्यान, सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व या कामाची जबाबदारी देऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यासाठी हाताळणी, वाहतूक व विमा खर्चासह सुमारे 47.15 लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या नावाने एक इतिहास नोंद होईल असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना यावेळीआशिष शेलार यांनी व्यक्त केली. आज लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे.

तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व…

अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत. रघुजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होवून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगढ, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला.

मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात येणार – मुख्यमंत्री

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही महाराष्ट्रात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर टिव्ट करत आनंद व्यक्त केला आहे. “नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी 1745 च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे”. असं पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News