ठाणे – शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक ठाण्यात धक्का बसला आहे. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नौपाड्यातील उबाठा गटाचे उपविभागप्रमुख प्रितम रजपूत, उपविभागप्रमुख राजेश पवार, गट प्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी निवडणुकीत ठरवले…
आनंद आश्रम येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान ७२ नगरसेवक शिवसेने सोबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आतापर्यंत मुंबईतील ७० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही…
दुसरीकडे आज ठाणे शहरातील उबाठाच्या पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात शाखा प्रमुख संजय कदम, स्वप्नील नेवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडीलकर, आदित्य पंडित, यश सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव या नौपाडा आणि बी कॅबिन भागातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते. शिवसेना आणि उबाठामध्ये हा फरक आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला.