राज्यात काहीजण जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवताहेत, नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा – हर्षवर्धन सपकाळ

नाशिकमध्ये गतकाळात काही अप्रिय घटना घटल्या त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो व ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना शिक्षा द्या... पण चोर सोडून संन्यासाला फाशी असे होता कामा नये.

नाशिक – पुरोगामी महाराष्टाला वेगळ्या विचारांची परंपरा लाभली आहे. पण सध्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले.  नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात हुतात्मा स्मारक ते गाडगे महाराज पुलापर्यंत संविधान सद्भावना यात्रा काढण्यात आली. या यात्रेत प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना शिक्षा द्या…

आज महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवण्याची वेळ आली असून त्यासाठीच सद्भावना यात्रा काढली जात आहे असे सांगून नाशिकमध्येही सद्भावनेची मशाल तेवत ठेवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. नाशिकमध्ये गतकाळात काही अप्रिय घटना घटल्या त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो व ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना शिक्षा द्या… पण चोर सोडून संन्यासाला फाशी असे होता कामा नये. बंधुत्व, सद्भाव, संस्कृती व परंपरेचे भान असल्याशिवाय आपण गुण्या गोविंदाने राहू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार सर्वांसाठी प्रमाण आहे. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या थोर संतांच्या विचाराचा वारसा आपल्याला लाभला आहे, माणुसकीचा धर्म त्यांनी शिकवला आहे. पण काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. असे यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काहीजण जाती-धर्मात भांडणे लावताहेत…

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मस्साजोग ते बीड व नागपूर येथील सद्भावना यात्रेनंतर आज नाशिक शहरात सद्भावना यात्रा काढण्यात आली. १ मे रोजी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी परळीमध्ये संविधान संकल्प सत्याग्रह केला जाणार आहे तर ४ व ५ मे रोजी परभणीत संविधान बचाव यात्रा आयोजित केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. तसेच संविधानाने शोषित, पीडित, दलित व वंचित समाजाला अधिकार दिले, महिलांना मतदानाचा अधिकार दिला, स्त्री पुरुष समानतेचे सुत्र आपण स्विकारले. मुठभर हातात राज्यसत्ता व धर्मसत्ता होती आणि हम करे सो कायदा होता पण संविधानाने ही परिस्थिती बदलली. आज काही लोक जातीजातीत व धर्माधर्मात भांडणे लावत आहेत हे महाराष्ट्राला शोभणारे नाही म्हणूनच काँग्रेस सर्वांच्या मनात सद्भावना वाढीस लागावी यासाठी राज्यात सद्भावना यात्रा काढत आहे. असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News