नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण, भारत – पाक युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात घटली, आणि बाजार समित्यांमधील कांद्याची आवक वाढली. परिणामी कांद्याचे दर कोसळले आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचा दर 1,000 रूपये प्रति क्विंटल इतका खालीपर्यंत घसरला आहे. परिणामी शेतकरी आता चांगलाच संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. आता नाफेडकडून सुरु होणाऱ्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कांद्याचे दर 1,000 रू. प्रति क्विंटल
नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कांदा 1 हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच भारताने पाकिस्तानसोबत होणारी निर्यात बंद केली. त्यामुळे कांद्याचे दर घसरले. तसेच बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. तसेच बांगलादेशात 30 टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले आहे.

नेमकी कारणे काय?
गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा फटका कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, कांदा बियाणे तसेच आंबा पिकाला फटका बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कांद्याची प्रत पावसामुळे खराब झाली आहे. दुसरीकडे भारत – पाक युद्धामुळे घटलेली निर्यात आणि बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. तसेच बांगलादेशात 30 टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले आहे. या कारणांमुळे कांद्याचे दर कोसळले आहेत.
नाफेडच्या खरेदीकडे लक्ष
नाफेड एनसीसीएफ यांनी अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा कधी सुरु होते, त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कांद्याची आवक जास्त आणि बाजारात कमी मागणी अशी परिस्थिती सध्या आहे. देशांतर्गत कांदाचा पुरवठा वाढल्याने थेट कांदा दरावर परिणाम आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या दर 1,000 ते 800 या दरम्यान चालला आहे.