सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत नोकरी मिळावी हे अनेकांचे स्वप्न असते. आता अशा इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि बँकांच्या शाखांच्या विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी भरती केली जाण्याची शक्यता आहे.
50 हजार जागा उपलब्ध होणार?
आगामी काळात बँका विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये 50000 कर्मचाऱ्यांची भरती करेल, अशी माहिती आहे. वेगवेगळ्या बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या भरतीमध्ये 21000 पदं अधिकाऱ्यांची असतील तर इतर पदही क्लार्क किंवा इतर असतील. सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक या आर्थिक वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स सह 2000 लोकांची भरती करणार आहे. या प्रक्रियेपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियानं 505 प्रोफेशनरी ऑफिसर्स तर 13455 ज्युनिअर असोसिएट्स ची भरती केली आहे.

पंजाब नॅशनल बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. बँकेनं चालू आर्थिक वर्षात 5500 कर्मचारी वाढीचं ध्येय ठेवलं आहे. मार्च 2025 मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 102746 इतकी होती. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आगामी काळात इच्छुकांसाठी संधीचे मोठे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेंट्रल बँक मोठी भरती करणार?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया चालू आर्थिक वर्षात 4000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं नियोजन करत आहे. वित्त मंत्रालयानं सरकारी बँकांना त्यांचं कार्यक्षेत्र वाढवण्यास सांगितलं आहे. याशिवाय बँकांच्या उपकंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करुन चांगला परतावा मिळवण्यास सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर वाणिज्य तसेच बँकींग क्षेत्रात मोठी नोकरीची संधी शोधत असाल तर ही संधी तुमच्याठी असू शकते. आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याचे तुमचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होऊ शकते.