पुणे: दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई, गैरप्रशासन, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर हीही पाणीटंचाईची कारणे आहेत. या पाणीटंचाईमुळे शहरांसह ग्रामीण भागातील नागरिक देखील त्रस्त आहेत.
महाराष्ट्रात सध्या मोठी शहरे आणि ग्रामीण भागात तीव्र पाणीसंकट निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिलमध्येच अशी स्थिती निर्माण झाल्याने मे महिना कसा निघेल, असा सवाल आता यानिमित्ताने उभा राहत आहे. राज्यात गत काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नदी, नाले, विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी खोलीवर गेली आहे.

16 जिल्ह्यांत पाणीबाणी
सध्या राज्यातील 16 जिल्ह्यांतील 358 गावे आणि जवळपास 26 वाड्या वस्त्यांवर जलसंकट निर्माण झाले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनाकडून 478 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. यात 30 शासकीय तर 448 खासगी टँकर्स असल्याचे चित्र आहे.
मराठवाडा, उ.महाराष्ट्र तहानला!
राज्यात सर्वाधिक पाणीटंचाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्भवली आहे. या विभागात एकूण 158 टँकर्स लावण्यात आले आहेत. यातील केवळ 135 टँकर्स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ अहिल्यानगर येथे 56 टँकर्स सुरू केले गेले आहेत. 49 गावे आणि 235 वाड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विदर्भातील अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या चार जिल्ह्यांत 50 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही सध्या भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे, जालन्याच्या जाफराबाद नगरपालिका परिसरात चक्क दहा दिवसांतून पाणीपुरवठा केला जात आहे. अवघ्या मराठवाडा भागात सध्या 192 टँकर शासनातर्फे चालत असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. तर काही प्रमाणात खासगी टँकरही आहेत.
एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा बहुतांश जिल्ह्यांत चाळीशी पार झाला आहे. परिणामी भूजल पातळी खोल चालली आहे. एप्रिल महिना संपायला आणखी आठवडा शिल्लक आहे. एप्रिलमध्येच पाणीटंचाईने डोकं वर काढलं आहे. मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आव्हान केले जात आहे. तसे काही ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे,