महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही, सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणार, काय म्हणाले मुख्यमंत्री?

पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करुन त्यांनी पाकिस्तानात परत जावे, असे आदेश केंद्राच्या वतीनं देण्यात आलेत. त्यानंतर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यात काहीजणं सापडत नसल्याचं वृत्त समोर आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुंबई- महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नसून, सगळ्या पाकिसतानी नागरिकांना परत पाठवण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. राज्यात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वृत्तही त्यांनी फेटाळून लावलंय. महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरु झाली. यात महाराष्ट्रात पाच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आलीये. त्यातील अनेकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतलीय. केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयात भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरु झाली. यात महाराष्ट्रात पाच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली.

महाराष्ट्रात किती पाकिस्तानी नागरिक?

1. राज्यात 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरिक
2. सर्वाधिक 2458 पाक नागरिक नागपुरात
3. ठाण्यात 1106 पाकिस्तानी नागरिक
4. मुंबई महानगरात 28 पाकिस्तानी नागरिक
5. पुण्यात 114, पिंपरी-चिंचवडमध्ये 290 पाकिस्तानी
6. नवी मुंबईत 239 पाकिस्तानी नागरिक
7. जळगावात 393, अमरावतीत 118

107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता?

राज्यात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्यांच्या चर्चाही सुरु झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याला दुजोरा दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही असं सांगत, सगळ्यांना परत पाठवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

काय म्हणालेत मुख्यमंत्री?

मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या सुलट्या बातम्या करू नका,एकही पाकिस्तानी. नागरिक हरवला नाही, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत, सर्व बाहेर चालले आहेत, सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे, राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाहीत, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार

केंद्राचे काय आदेश?

पहलगाम हल्ल्यानंतर परराष्ट्र सचिवांनी २३ एप्रिलला पाकिस्तानातून भारतात आलेल्या १४ श्रेणीतील व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली होती. २५ एप्रिलला भारत सोडण्याची मुदत नंतर २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. या निर्णयामुळं रविवारी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावाच लागणार आहे. दीर्घ मुदतीचा व्हिसा असणाऱ्यांना यातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.

देश न सोडणाऱ्यांवर काय कारवाई?

ही मुदत ओलांडल्यानंतरही पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकेल.
देश न सोडणाऱ्यांवर काय कारवाई?
1. आदेशाचं उल्लंघन केल्यास बेकायदेशीर परदेशी नागरिक ठरणार
2. नव्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्टनुसार अपराधी
3. 1 ते 5 वर्षांची शिक्षा किंवा 10 ते 50 हजारांचा दंड
4. शिक्षा पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानात प्रत्यार्पण शक्य

ज्यांनी या काळात व्हिसा वाढवण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनाही रविवारपर्यंत पाकिस्तानात परतावं लागणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात केंद्रान कठोर भूमिका घेतलीय. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई तीव्र होत असतानाच, पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानी नागरिकांनाही आता परतावं लागणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News