पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात हिंदूंना वेचून मारण्यात आलं असलं तरी यात दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह हा काश्मिरी तरुणाचाही बळी गेला. पर्यटकांना घोड्यावरून पहलगामची पर्यटनस्थळं दाखवण्याचं काम तो करीत असे. मृत्युमुखी पडलेला आदिल त्याच्या घरातील एकटाच कमावता होता. या हल्ल्यात महिलेचा जीव वाचवताना आदिलचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. त्यानंतर आदिल आणि आदिलचे कुटुंबीय देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत आणि त्यांना घर बांधून देण्याची घोषणा केली.

आदिलच्या कुटुंबीयांना शोक अनावर
आदिल लहानपणापासून हेच काम करत होता, अशी माहिती आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी दिलीय. आम्ही घरात असताना पहलगाममध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय. आदिल ज्या ग्रुपला घेऊन चालला होता, त्यातील एका पर्यटकाला दहशतवाद्यांनी गोळी मारली. या पर्यटकाची मुलगी वडिलांना वाचवण्यासाठी समोरं गेली, तिचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न आदिलनं केला.
आदिलनं हल्लेखोरांना गोळीबार करण्यास विरोध केला. निष्पाप लोकांना का मारता? त्यांचा काय गुन्हा आहे? त्यांची काय चूक आहे? असं तो विचारत असताना दहशतवाद्यांनी आदिलवर हल्ला केला. आदिलने त्यांच्यावर हल्ला केला. आदिलला चार गोळ्या लागल्या. एक मानेच्या मागच्या बाजूने मारली ती आरपार गेली. दुसरी छातीवर लागली. तिसरी छातीच्या बाजूला लागली. चौथी हाताच्या हाडाला लागली.
काश्मिरातील तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न – आदिलचे वडील
जेव्हा माणूस कामात असतो तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळे विचार येत नाहीत. इथे हाताला काम असल्याने सगळं काही ठीक चाललं होतं. पण जेव्हा हे बिघडेल तेव्हा लोकांच्या मनात काही ना काही दुसरा विचार येईल. असं आदिलच्या वडिलांनी सांगितलंय.
माणुसकी जास्त महत्त्वाची
दहशतवाद्यांनी कलमा विचारावं की नाही, खरं तर त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आमचा संबंध मानवतेशी आहे. आदिलने पर्यटक हिंदू आहेत की शीख आहेत हे पाहिलं नाही. त्यानं माणुसकीसाठी आपला जीव दिला. हिंदू असो वा मुस्लीम… त्यांनी आदिलच्या बलिदानाकडे पाहून माणुसकी काय आहे हे समजून घ्यावं. हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई… सर्व एकत्र राहूनच यशस्वी होऊ शकू, असं आदिलचे वडील म्हणालेत.
आदिलचे वडील काश्मिरी तरुणांना काय म्हणाले?
आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी काश्मिरच्या तरुणांना मोलाचा सल्ला दिलाय. काश्मिरी तरुणांनी माणुसकीच्या मार्गाने जावं, असं आवाहन त्यांनी केलंय. . कुणाचा जीव घेणं ही माणुसकी नाही, असं सांगत असताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू मानवतेची साक्ष देणारे होते.