मुंबई: देशात तापमानाने कहर केला आहे. पण, महाराष्ट्र सध्या सर्वाधिक हॉट राज्य ठरत आहे. देशभरात सध्या प्रचंड उष्मा वाढला आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक कासावीस झाले आहेत. ठिकठिकाणी तापमान 45 अंशाच्या पार जाऊन पोहोचले आहे.
चंद्रपूर देशातील सर्वात हॉट शहर
आज देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली. चंद्रपुरात आज 45.6°cची नोंद झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याच मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर सर्वात हॉट शहर ठरलं होतं. नागपूरात येत्या तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून आजपासून येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील इतर शहरांतील तापमान
केवळ विदर्भच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ही प्रचंड तापला आहे. परभणीत आज 42.2 अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर 40.9 बीड 41.7, सोलापूर 43 अंश सेल्सिअस वर गेले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे 39.9 अंश सेल्सिअस अहिल्यानगर 38 नाशिक 38.4 असून उष्णतेच्या प्रचंड झळा लागत आहेत. मुंबई उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्ण व आद्र हवामान असल्याने उकाडा आणि घामाच्या धारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
अवकाळी पावसाची शक्यता
एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, सांगली, सातारा, लातूर या जिल्ह्यांत पाऊस कोसळलाय. त्यामुळे नागरिकांना ऊन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, आगामी दिवसात नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.