जळगाव – चोपडा शहर शनिवारी रात्री ऑनर किलींगनं हादरलंय. लग्न समारंभाच्या हळदीच्या कार्यक्रमात पित्यानं मुलगी-जावयावर गोळीबार केला. पित्याच्या गोळीबारात मुलीचा दुर्दैवी मृत्यू, जावई गंभीर जखमी गोळीबार करणाऱ्या पित्याला वऱ्हाड्यांनी दिला चोप, गंभीर जखमी झालेत. चोपड्यात ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे बापाने केवळ लेकीचाच नाही तर येऊ घातलेल्या नव्या जीवालाही संपवलं.
चोपड्यात सुरु असलेल्या एका लग्न समारंभातील हळदीचा कार्यक्रम रक्तरंजीत झाला. या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर पित्यानं गोळीबार केला. दोन वर्षांपूर्वी मुलीनं केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरुन किरण मांगले यानं रागाच्या भरात हे कृत्य केलं. किरण मांगले हा सीआरपीएफचा निवृत्त अधिकारी आहे. पित्याच्या गोळीबारात मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झालाय. तर जावई अविनाश वाघ या गोळीबारात गंभीर जखमी झालाय.

नेमकं काय घडलं?
१. अविनाश आणि तृप्ती प्रेमविवाहानंतर चोपड्यात आले होते
२. अविनाशच्या बहिणीचा चोपड्यात हळदीचा कार्यक्रम होता
३. चोपड्यात हळदीच्या कार्यक्रमात तृप्तीचा पिता किरण मांगले बंदुकीसह दाखल
४. प्रेमविवाहाच्या रागातून पित्यानं मुलगी, जावयावर केला गोळीबार
५. गोळीबारात मुलगी तृप्ती जागीच ठार
६. जावई अविनाशच्या पाठीत मारली गोळी, दुसरी गोळी हातावर
७. संतप्त वऱ्हाड्यांनी गोळीबार करणाऱ्या किरण मांगलेला केली जबर मारहाण
८. जावई आणि गोळीबार करणारा सासरा हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जळगावात रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हल्लेखोराला वऱ्हाड्यांचा चोप
लग्न घरात हळदीच्या आनंदाच्या कार्यक्रमात अनपेक्षितपणे घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं सगळेच भांभावले.गोळीबारानंतर लग्नघरात एकच गोंधळ उडाला. गोळीबार किरण मांगलेनं केल्याचं लक्षात आल्य़ानंतर त्याला पकडून वऱ्हाड्यांनी जबर मारहाण केली. ऑनर किलिंगच्या या घटनेनं चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडालीय. प्रेमविवाहानंतर सुखानं संसार करणाऱ्या तृप्ती आणि अविनाशचं आयुष्य, तृप्तीच्या वडिलांच्या मनातील रागानं उद्ध्वस्त केलंय. पोटची मुलगी तर किरण मांगलेनं गमावली, आता उपचारानंतर उर्वरित आयुष्य त्याला तुरुंगात जगावं लागणार आहे.