बीड– मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि अवादा पवनचक्की कंपनीला खंडणी मागण्या प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शनिवारी वाल्मिकची प्रृती बिघडल्यानं त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली.
कराडला बोलण्यास आणि श्वासोश्वास करण्यात त्रास होत असल्याचं सांगण्यात येत होतं. बीड जिल्हा रुग्णालयात त्याची तपासणी केल्यानंतर आणी सीटी स्कॅन केल्यानंतर त्याचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच कराडच्या प्रकृती बिघण्याचं कारण ढोंग होतं की काय, अशी चर्चा आता सुरु झालीय.

कराडला जेलमध्ये विशेष सोयीसुविधा पुरवल्याचा आरोप
वाल्मिक कराडला जेलमध्ये दाखल केल्यापासून त्याला जेलमध्ये स्पेशल ट्रिटमेंट दिली जात असल्याचाआरोप सातत्यानं करण्यात येतोय. वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय मानण्यात येतो. त्यामुळेच त्याची बीड जिल्हा कारागृहात विशेष बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तुरुंगातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे त्याच्यासेवेत असल्याचंही सांगण्यात येतंय. या प्रकरणात कराडच्या सेलमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या वतीनंही यापूर्वी करण्यात आलेली आहे.
हल्ल्यानंतरही कराड बीडच्या जेलमध्येच
बीड जिल्हा कारागृहात कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाम केल्याचं प्रकरण ३१ मार्च रोजी समोर आलं होतं. त्यानंतर गित्ते आणि गायकवाड यांची रवानगी दुसऱ्या जेलमध्ये करण्यात आली. मात्र वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे अद्यापही बीडच्या जिल्हा कारागृहातच आहेत. कराडला बीड जिल्ह्याच्या बाहेर जेलमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. त्यामुळेच कराडच्या आजारपणावर सोंग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
कराडला शिक्षा कधी होणार?
संतोष देशमुख या मस्साजोगच्या सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन ही हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली असली तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. बीडच्या विशेष मकोका कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु आहे. खंडणी आणि हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडला काय शिक्षा होणार आणि कधी होणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.