नवी दिल्ली- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानतील तणाव वाढताना दिसतोय. पहलगाम हल्ल्यातील दोषांनी कठोर शिक्षा होईल, याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. तर सिंधू कराराने पाणी रोखल्यास पाकिस्तानकडे 30 अणुबॉम्ब तयार असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानच्या मंत्र्यानं केलीय. दुसरीकडे पीओकेत झेलम नदीच्या पूरस्थितीला भारत जबाबदार असल्याचा कांगावाही सुरु करण्यात आलाय.
भारतीय सैन्य सज्ज
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.
१. देशातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या कारवाईचा रविवार शेवटचा दिवस असल्यानं, देशभरात ही कारवाई जोमानं सुरु असल्याचं दिसतंय.
२. काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशन जोरात सुरु आहे. गेल्या ३ दिवसांत १० दहशतवाद्यांनी घरं सैन्यदलानं उडवून दिलीयेत.
३. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केलीय.
४. अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण केले.
५. आक्रमणासाठी ही युद्धसज्जतेची चाचणीच मानण्यात येतेय.
६. भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि कधीही, कुठेही, कसेही, युद्धासाठी सज्ज आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
७. रविवारच्या मन की बातममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत, शोक व्यक्त केलाय.
८. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.

पाकिस्तानची दर्पोक्ती
दुसरीकडे पाकिस्तानकडून कांगावा आणि दर्पोक्तीचं सत्र सुरुच आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाण्याचा एक थएंबही पाकिस्तानात जाऊ देणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतलीय.तर या निर्णयानं धास्तावलेल्या पाकिस्तानकडून पाण्यावर हक्क सोडणार नसल्याची भूमिका घेण्यात येतेय.
१. या सगळ्यात चीनकडून पाकिस्तानला लांब पल्ल्याची 15 क्षेपणास्त्रे पुरविल्याचं वृत्त प्रसारित झालंय.
२. चीनने पाकिस्तानला जेएफ-17 लढाऊ विमानांसाठी -15 प्रकारच्या अतिदीर्घ पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांची तातडीने पूर्तता केल्याचा दावा करण्यात येतोय.
३. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या अंतर्गत साठ्यातून ही क्षेपणास्त्र देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
४. चीनच्या जोरावर पाकिस्तानी नेतेही आक्रमक भाषा करताना दिसतायेत.
५. युद्धात रक्ताचे पाट वाहतील अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केली होती.
६. त्यानंतर, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनिफ अब्बासी यांनीही भारताला उघडउघड अणुहल्ल्याची धमकी दिलीय
७. घोरी, शाहीन, गजनवी ही क्षेपणास्त्रं आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत.जर भारताने सिंधू जल करार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार राहावं लागेल. अशी वल्गना अब्बासी यांनी केलीय.
पाकला आणखी एक झटका
सिंधू करार स्थगितीनं धास्तावलेल्या पाकिस्तानला या सगळ्यात आणखी एक फटका पडलाय. शनिवारी झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूरस्थिती उद्भवलीय. भारताने अचानक झेलम नदीमध्ये पाणी सोडल्याने ही पूरजन्य परिस्थिती उद्भवल्याचा कांगावा आता पाकिस्तातून करण्यात येतोय. अचानक आलेल्या या पुरामुळे पीओकेची राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटीत एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता उरी धरणातून झेलम नदीत नेहमीपेक्षा जास्त पाणी सोडल्यानं पूरस्थिती निर्माण झाल्याचा पाकचा दावा आहे.
युद्धाचे संकेत?
सर्व पातळ्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी भारताकडून सुरु असल्याचं दिसतंय. दोन्ही देशांची तिन्ही सैन्यदलं हाय अलर्टवर आहेत. युद्ध सज्जता पूर्ण झाल्याचं मानण्यात येतंय. आता दोन्ही देशांतील वाढत्या तणावात युद्ध कधी सुरु होणार, याकडे आता जगाचं लक्ष आहे.