आझाद मैदानातील आंदोलक शिक्षकांना शरद पवारांचे आश्वासन; लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द

"शिक्षकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाईल," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

राज्यातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. हजारो शिक्षक आझाद मैदानात एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर आता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांनी त्या ठिकाणी जात शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शरद पवारांनी काय भूमिका मांडली?

शिक्षकांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून न्याय मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्रातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मान देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनानी घेतली पाहिजे. काल मला रोहित पवारांकडून समजलं की इथं एक राज्यातील मंत्री येत आहेत. मला वाटलं की हे मंत्री येत आहेत तर चर्चा करून प्रश्न सोडवतील. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. राज्य सरकारला स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांनी उद्याची पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी अंतकरणापासून स्वीकारली आहे, त्यांच्यावर संघर्षाची वेळ येता कामा नये.”

शिक्षकांच्या मागण्या मान्य करा -शरद पवार

“शिक्षकांची जी मागणी आहे त्यासाठी लवकरात लवकर पैशाची तरतूद करा. तुमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाईल,” अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ, अशा शब्दांत शिक्षकांना आश्वस्त केलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News