मुंबईतील वातावरणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात होते. तरी २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (CREA) या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार,मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे.
मुंबईतील प्रदुषण नागरिकांसाठी धोक्याची घंटा
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देवनार, सायन, कांदिवली पूर्व आणि बीकेसी यांसारख्या मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पद्दुचेरी आणि विजयवाडा यांसारख्या इतर किनारपट्टीच्या शहरांपेक्षाही अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात असे उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकेत आहेत.CREA ने देशातील २३९ शहरांतील हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक ठरले आहे. केवळ देवनारच नाही, तर मुंबईतील इतर काही भागांमध्येही अशीच स्थिती आहे.

दक्षिण भारतातील शहरांत हवा समाधानकारक
दक्षिण भारतातील चेन्नई आणि पुद्दुचेरीतील निवासी भागांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ आढळून आली आहे. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी, ते मुंबईतील देवनारसारख्या भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. थोडक्यात काय तर दक्षिण भारतातील बहुतांश शहरांतील हवेची गुणवत्ता अद्याप समाधानकारक आहे, हेच यावरून स्पष्ट होते.
मुंबईतील हवा प्रदुषण नियंत्रित करण्याची गरज
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईकरांनी देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.