कोल्हापूर- मराठमोळी कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा ग्रुपच्या फॅशन शोमध्ये झळकली आणि एक नवा अध्यायच सुरू झाला. कोल्हापूर चप्पल वापरुन त्याचं श्रेय दिलं नसल्यानं वाद निर्माण झाला. माघार घेतलेल्या प्राडानं आता वाद मिटवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलंय.
कोल्हापुरच्या पारंपरिक कारागिरांना ही बाब खटकली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यावर आवाज उठवला, कोल्हापुरी वापरल्याचा हा वाद हायकोर्टात पोहोचला
अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत आक्षेप घेतला आणि अखेर इटालियन फॅशन हाऊस प्राडानंही याची दखल घेतली आणि फॅशन शोमधली चप्पल कोल्हापुरीच असल्याचं मान्य केलं

कोल्हापुरी जगात भारी
इटालियन फॅशन हाऊस प्राडा गृपने थेट कोल्हापुरात येऊन पारंपरिक कारागीर समुदायाला सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केलीये. यामुळं आता महाराष्ट्राची कोल्हापुरी चप्पल जागतिक पातळीवर पोहोचणार आहे.
आता प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरला येतंय. कोल्हापुरी चप्पल नेमकी कशी बनते हे पाहण्यासाठी प्राडाचं तांत्रिक विभागाचं पथक कोल्हापुरातल्या कारागिरांना भेटणार आहे. भारत सरकारकडून जीआय मानांकन मिळालेल्या कोल्हापुरी चपलेला यामुळं सुगीचे दिवस येतील.
प्राडाचा काय प्रस्ताव
१. 15, 16 जुलैला ‘प्राडा’चे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर
२. प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापूर,मुंबई दौर्यावर येणार
३. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करणार
४. तांत्रिक विभागाचं पथक कोल्हापुरातल्या कारागिरांना भेटणार
५. प्राडा महाराष्ट्रातील पारंपरिक कारागीर समुदायाबाबत विशेषतः कोल्हापुरी चप्पल उद्योगाबाबत थेट सहकार्य करणार आहे.
६. या अनुषंगाने प्राडा ग्रुपने मेड इन जपान, मेड इन स्कॉटलंड तशीच मेड इन इंडिया -कोल्हापूरी ही संकल्पना मांडली आहे.
जगभरात दिमाखदार कामगिरी
वादातून का होईना पण कोल्हापुरीचा सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता कोल्हापुरी चप्पल लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिमाखदार कामगिरी करणार हे निश्चित मानण्यात येतंय.
कोल्हापूर जगात आकर्षण ठरणार
महाराष्ट्रात कोल्हापूर शहराची वेळी ओळख आहे. करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या निमित्तानं ऐतिहासिक ओळख असलेल्या या शहराला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आहे. प्रगतीशील विचारांचं शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. कुस्ती, कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, कलावंतांची नगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरी चपलेला मिळणार असणाऱ्या जगमान्यतेमुळे कोल्हापूर जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.