तेहरान- इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या महिन्यात 12 दिवस युद्ध झालं होतं. त्या काळात 16 जूनला इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे राष्ट्रपती मसूद पजशकियान जखमी झाले होते. इराणची न्यूज एजन्सी फार्सनं ही माहिती दिली आहे.
तेहरानच्या पश्मिमेकडे एका इमारतीवर 16 जून रोजी इस्रायलनं सहा मिसाईल्स डागले होते. त्या इमारतीत त्यावेळी सुप्रीम नॅशनल कॅबिनेट सिक्युरिटीची बैठक सुरु होती.

नेमकं काय घडलं?
या मिटिंगसाठी इराणचे राष्ट्रपती पजशकियान यांच्यासोबत संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ, न्यायालयाचे प्रमुख मुलाम हुसैन मोहसेनी एजई आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हल्ला झाला त्याच्या खालच्या मजल्यावर ही मीटिंग सुरु असल्यानं हे सगळे थोडक्यात बचावले. हल्ला झाल्यानंतर हे सर्व बडे नेते इमर्जन्सी गेटमधून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
इराणच्या राष्ट्रपतींना श्वास कोंडून मारण्याची योजना
इराणच्या राष्ट्रपतींना नसरल्लाह सारखं मारण्याची इस्रायची योजना होती. बैरुतमध्ये 1 ऑक्टोबर 2024 रोजी नसरल्लाहच्या सिक्रेट बंकरवर इस्रायलनं हल्ला केला होता. हिजबुल्लाच्या टॉप कमांडरसोबत नसरल्लाह मिटिंग करतेवेळी हा हल्ला करण्यात आला. विषारी धुरात श्वास कोंडल्यामुळे त्यावेळी नसरल्लाहचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रपतींवर केलेल्या हल्ल्यावेळीही इमारतीच्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर आणि व्हेंटिलेशन सिसिस्टमवर हल्ला करण्यात आला. आत असणाऱ्या व्यक्तींनी बाहेर पडू नये आणि आतमध्ये श्वास कोंडणारं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता.
राष्ट्रपतींच्या पायाला जखम
हल्ल्यानंतर या परिसरातील वीज पुरवठा तातडीनं खंडीत करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच इमारतीत असलेल्या इमर्जन्सी गेटमधून बाहेर पडण्यात राष्ट्रपती आणि इतर अधिकारी यांना यश आलं. यावेळी पळताना राष्ट्रपती पजशकियान यांच्या पायाला जखम झाली. तर इतर अधिकाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे.
इस्रायल मला मारण्यात अपयशी- इराणचे राष्ट्रपती
७ जुलैला युद्धबंदी झाल्यानंतर इराणच्या राष्ट्रपतींनी या हल्ल्याची माहिती जाहीर केली. इस्रायलनं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले, असं इराणच्या राष्ट्रपतींनी एका मुलाखतीत जाहीरपणे सांगितलं. इस्रायली सैन्यानं गुप्तहेरांच्या मदतीनं या मिटींगची माहिती मिळवली होती आणि त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला. आता या मिटींगची माहिती इस्रायलला कशी मिळाली याची चौकशी करण्यात येतेय.