उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना पुन्हा युतीची साद, मनसेचा निर्णय इगतपुरीत?

आगामी निवडणुकीच्या चाचपणीसाठी मनसेनं इगतपुरीत 3 दिवसांचं शिबीर बोलवलंय, या शिबिरात युतीचा निर्णय होणार की मराठीच्या मुद्द्यावरून झालेला भरतमिलाफ केवळ तेवढ्यापुरताच ठरणार? हे येणाऱ्या काही दिवसांत कळेलच.

मुंबई- उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा अगदी दिल्लीपर्यंत पोहचल्या आहेत, पण गल्ली ते दिल्ली युतीचा बोभाटा असणाऱ्या या पॉलिटिकल ड्राम्यात मनसे मात्र सावध भूमिकेत आहे, उद्धव ठाकरेंकडून टाळीवर टाळी दिली जातेय, मात्र मनसेची टाळी नेमकी कधी? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे, त्यामुळेच संजय राऊतांनी पुन्हा सामनातून साद घातलीय.

हिंदी भाषेचा निर्णय मागे घेतल्यानंतर वरळीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत विजयी मेळावा पार पडला खरा. त्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत असल्याची घोषणा केली. मात्र राज ठाकरेंनी मात्र याबाबत जाहीर भाष्य करणं टाळलंय. त्यातूनच त्यांना पुन्हा साद घालण्यात आलीयय

रोखठोकमधून पुन्हा युतीची साद

सामना वृत्तपत्राच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी लिहिलंय की, मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ठाकरेंच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची भीती एकनाथ शिंदेंना वाटतेय. त्यामुळे एकनाथ शिंदे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले, अमित शहांना भेटले. ”महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही”. ”मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शाह-शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा शिंदे गटात सुरू आहे. ”शाह आणि शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज आणि उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत”. अशी विधानं शिंदेंचे मंत्री करतायत. मात्र कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही. वरळीनंतर मीरा-भाईंदरमध्ये मराठी एकजूट उसळली. मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई, महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे. तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या राजकारणामुळे आणि संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे.

युतीवर भाष्य नको, मनसे नेत्यांना आदेश

महापालिकेसाठी संजय राऊतांकडून जरी रोज युतीची साद घातली जात असली, तरी राज ठाकरे यांनी मात्र आपल्या नेत्यांना युतीवर भाष्य न करण्याची सक्त ताकीदच देऊन टाकलीय.

राज ठाकरेंची सावध भूमिका

एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.

राज ठाकरे ।

भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप

युतीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या होणाऱ्या भेटीगाठी आणि राज ठाकरेंचं असलेलं मौन यामुळे संभ्रम कायम आहे.
भाजपा आणि शिंदेंना युती होऊ द्यायची नाही, असा आरोपही ठाकरेंच्या गोटातून करण्यात येतोय.

इगतपुरीत मनसेचा निर्णय होणार?

एकीकडे हे राजकीय वार पलटवार सुरू आहेत, तर दुसरीकडे अनेकदा भूमिका बदलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंचा सावध पवित्रा ठाकरेंच्या शिवसेनेची काळजी वाढवणारा आहे. आता आगामी निवडणुकीच्या चाचपणीसाठी मनसेनं इगतपुरीत 3 दिवसांचं शिबीर बोलवलंय, या शिबिरात युतीचा निर्णय होणार की मराठीच्या मुद्द्यावरून झालेला भरतमिलाफ केवळ तेवढ्यापुरताच ठरणार? हे येणाऱ्या काही दिवसांत कळेलच..


About Author

Smita Gangurde

Other Latest News