Raish Shaikh : भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर लष्कराचे अभिनंदन करण्यात येत असून, ठिकठिकाणी तिरंगी रैली काढण्यात येत आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हल्ल्याचा निषेध आणि सैन्य दलाने अभिनंदन करणारा विशेष ठराव यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडा, या आशयाचे पत्र विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिल्याचे भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लिहिले आहे.
घटनेमुळे देशभरात संताप आणि दुःख…
दरम्यान, या ठरावात मृतांच्या कुटुंबांबद्दल आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या पाहिजेत आणि जखमींना आपण त्यांच्या सोबत असल्याचा पाठिंबा दर्शविला पाहिजे. २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या घटनेमुळे देशभरात संताप आणि दुःख व्यक्त झाले असून समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि राजकीय क्षेत्रातील नेते या क्रूर कृत्याचा स्पष्ट निषेध करण्यासाठी एकत्र आले आहेत.

संदेश सभागृहाने देणे अत्यंत आवश्यक…
पहलगाम हत्याकांड हा केवळ निष्पाप जीवांवर हल्ला नाही, तर आयडिया ऑफ इंडियावरच हल्ला आहे. म्हणून, महाराष्ट्रातील लोक पीडितांच्या आणि राष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा स्पष्ट, मजबूत आणि एकत्रित संदेश आपल्या सभागृहाने देणे अत्यंत आवश्यक आहे, असे आमदार रईस शेख यांनी पत्रात नमूद केले आहे. ही राष्ट्रीय एकता आणि विवेकाची बाब आहे की महाराष्ट्र विधिमंडळाने एकत्रितपणे शोक, संकल्प, एकता व्यक्त करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरसाठी सशस्त्र दलांचे कौतुक करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.