पाकिस्तानला जगात उघड पाडण्यासाठी पाठवण्यात येणारं शिष्टमंडळ वादाच्या भोवऱ्यात, नेतृत्वावरुनही बिनसलं!

ऑपरेशन सिंदूरनंतर जगातील वेगवेगळ्या देशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांवरुन राजकारण शिगेला पोहचलंय. या सात शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली, त्यात शशी थरुर यांच्या नावाच्या समावेशावरुन वाद रंगला आहे.

दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला जगात उघड पाडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळांवरुन वाद निर्माण झाला आहे. भारतातून ५९ खासदार ७ टीमच्या माध्यमातून जगभरात जाणार आहेत. काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्याकडे एका टीमचं नेतृत्व दिल्यानं वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी या टीममध्ये निवड केल्याबाबत आभार मानलेले असताना, संजय राऊत यांनी मात्र यावर टीका केली आहे.

सात शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण करणार?

१. शशी थरुर-काँग्रेस
अमेरिका, पनामा, ब्राझील, कोलोंबिया
२. रवीशंकर प्रसाद, भाजप
इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क
३. संजयकुमार झा, जेडीयू
इंडोनेशिया, जपान, कोरिया
४. बैजयंत पांडा, भाजपा
सौदी अरब, कुवेत, बहारिन
५. कनिमोझी करुणानिधी, डीएमके
स्पेन, ग्रीस, रशिया
६. श्रीकांत शिंदे, शिंदेंची शिवसेना
दुबई, काँगो, लायबेरिया
७. सुप्रिया सुळे, शरद पवार राष्ट्रवादी
इजिप्त, कतार, द. अफ्रिका

काँग्रेसनं या शिष्टमंडळासाठी जी चार नावं दिली होती, त्यात शशी थरुर यांचं नाव नव्हतं. मात्र तरीही त्यांच्या नावाची निवड सरकारतर्फे करण्यात आली आहे. शशी थरुर यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरी काँग्रेसनं सरकार लोकशाही प्रक्रिया राबवत नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते शिष्टमंडळात जाणार असले तरी काँग्रेसनं दिलेल्या नावांपैकी केवळ एकाचाच विचार झाल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे.

शिष्टमंडळात कोणती महत्त्वाची नावं?

१. असुदुद्दीन ओवैसी, एमआयएम
२. गुलाम नबी आझाद, डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आजाद पार्टी
३. प्रियंका चतुर्वेदी, ठाकरेंची शिवसेना
४. युसुफ पठाण, तृणमूल काँग्रेस
५. विक्रमजीत सिंह. आप
६. सरफराज अहमद, झामुमो

ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीममध्ये समावेश केल्यानं पंतप्रधानांचे आभार मानलेले असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. तर खासदारांची संख्या कमी असल्यानं पक्षाला प्रतिनिधीत्व मिळालं नसल्यांच सांगत अजित पवारांनी कसलीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे. इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांना शिष्टमंडळात स्थान देत एकीकडे राष्ट्रीय एकजूट तर दुसरीकडे इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. यातील काही नेते भविष्यात भाजपा किंवा एनडीएत दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. भारताकडून शिष्टमंडळ पाठवण्याच्या घोषणेनंतर दुसरीकडे पाकिस्ताननेही इतर राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात आठ जणांचं शिष्टमंडळ लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस आणि ब्रुसेल्समध्ये जाणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News