मिरा भाईंदर- मंगळवारचा दिवस गाजला तो मनसेनं मिरा भाईंदरमध्ये काढलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चानं. हिंदी नविरुद्ध मराठी या वादातून व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मनसेनं उत्तर देण्याचं ठरवलं. मात्र रात्रीच मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईनंतर दिवसभर हा मोर्चा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मिरा भाईंदरमध्ये परवानगी मिळते तर मराठी माणसांच्या मोर्चाला घोडबंदरचा पर्याय का दिला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला.
रात्री ताब्यात घेण्यात आलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांची दुपारी सुटका करण्यात आली. त्यानंतर मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिरा भाईंदरमध्ये पोहचले. त्यानंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली. अखेरीस व्यापाऱअयांना इशारा देत या मोर्चाची सांगता करण्यात आली.

महायुतीतील मतभेदही समोर
विधिमंडळ अधइवेशनातही हा मुद्दा गाजला. मिरा भाईंदरमध्ये पुकारलेल्या मोर्चाच्या आधीच मनसे नेत्यांची धरपकड करण्यात आली. त्यावरुन मिरा भाईंदरचे आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली. मोर्चा काढण्यापूर्वी अटटकेची कारवाई का केली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय मनसे नेत्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी या मुद्द्यावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलोनही केलं.
मुख्यमंत्र्यांनीही पोलीस महासंचालकांना झापलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत आल्यानंतर याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई आणि राज्यात कुणीही मोर्चा काढू शकतो, असं त्यांनी सांगितलं. मात्र मनसेच्या मोर्चाचा मार्ग पोलिसांनी दिला होता, त्याला विरोध झाल्यानं परवानगी नाकरण्यात आल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. त्यानंतर विधानसभेत गेल्यानंतर पोलीस महासंचालकांनी मनसेच्या नेत्यांना परवानगी का दिली नाही, अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मिरा भाईंदरमध्ये घोषणाबाजी
अटकेचा निषेध करत मिरा भाईंदरमध्ये पोहचलेल्या प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मोर्चाच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पन्नास खोके, एकदम ओक्के अशा घोषणा करण्यात आल्या. सरनाईक यांच्या दिशेनं पाण्याची बाटलीही फेकून मारण्यात आली. एकूण जमावाचा संताप पाहता प्रताप सरनाईक यांनी तिथून काढता पाय घेतला.
मनसे नेते आणि ठाकरे शिवसेना नेते एकत्र
दुपारी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या केडिया यांचं कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर काही वेळात अविनाश जाधव यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासह संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे हे नेते मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकर, राजन विचारे हेही पोहचले.
नादाला लागाल तर याद राखा, मनसेचा इशारा
शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली. पोलिसांना झुगारुन हा मोर्चा काढण्यात आला. जमलेली मराठी माणसांची संख्या पाहता पोलिसांनी धडा घ्यावा आणि व्यापाऱ्यांनीही धडा घ्यावा असं अविनाश जाधव म्हणाले. यापुढे मराठी माणसाच्या नादी लागाल तर आम्ही एकत्र येणार हे लक्षात ठेवा असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यानंतर मोर्चा समाप्तीची घोषणा करण्यात आली.