प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावं, सगळ्या भाषा या राष्ट्रभाषा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय?

सध्या राज्यभरात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. मनसे-शिवसेना मराठीविषयी आग्रही असताना संघाची यासंदर्भातील भूमिका काय आहे?

नवी दिल्ली- महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी हा संघर्ष सुरु असताना भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं, अशी संघाची भूमिका असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तसंच देशातील सगळ्या भाषा या राष्ट्रभाषा असल्याची भूमिकाही संघानं मांडलीय.

दिल्लीत चार दिवस झालेल्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीनंतर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाच्या शताब्दी वर्षातील नियोजनाची माहिती दिली.

धर्मांतरण आणि असंतुलनावर चर्चा

देशात क्षेत्र, भाषा आणि जातीच्या आधारांवर समाजात होत असलेल्या विभाजनाच्या प्रयत्नांवर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. देशात सामाजिक सद्भाव आणि एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पावलं उचलण्यावर एकमत झालं. वाढतं धर्मांतरण, कॅनडा, अमेरिका, बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले याबाबतची चिंता व्यक्त करण्यात आली. मणिपूरमधील संघर्षावरही या बैठकीत चर्चा झाली.

शताब्दी वर्षात प्रत्येक घरापर्यंत आणि गावापर्यंत

संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांबाबत या बैठकीत चर्चा झालव्याची माहिती सुनील आंबेकर यांनी दिली. या वर्षभरात ग्रामीण मंडल स्तरावर आणि शहरात वस्ती स्तरांवर हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. सद्यस्थितीत संघाच्या रचनेनुसार संघाची 58964 मंडळं आहेत तर 44055 वस्त्या आहेत. या हिंदू संमेलनांमध्ये समाजाचे उत्सव, सामाजिक एकता, सद्भाव, पंच परिवर्तन या विषयांवर चर्चा होईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. या कालावधीत घराघरापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न करुन सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी अभियान राबवण्यात येणार आहे.

प्रगती सर्वसमावेशक होण्याची गरज

देश आर्थिक आणि तांत्रिक पातळीवर प्रगती करत असताना समाजातील सर्व घटकांचा विचार होणं गरजेचं आहे, असं मत संघातर्फे मांडण्यात आलंय. यात पर्यावरण, कुटुंबातील जीवन मूल्यं,  सामाजिक जीवन, सद्भाव, पंच परिवर्तन या बाबी संघ समाजापर्यंत घेऊन जाणार आहे. समाजानं या घटकांचा विचार केला तर विकास आणि प्रगती एकतर्फी न राहता सर्वसमावेशक होईल. असंही आंबेकरांनी स्पष्ट केलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News