कुटुंब बळी देतं या संशयावरुन कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं; बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात नेमकं घडलं तरी काय?

पूर्णिया जिल्ह्यातील टेटगामा गावची लोकसंख्या 200 च्या आसपास आहे. आदिवासींचं गाव असलेल्या या गावात अंधविश्वासातून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला.

पूर्णिया, बिहार- बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात टेटगामा गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पाचही जणांना बेदम मारहाण केल्यानंतर डिझेल अंगावर टाकून जिवंत जाळण्यात आलं होतं.

या कुटुंबाला गावकऱ्यांनीच मारल्याचं आता समोर येतंय. गावात गेल्या दोन वर्षांत सहा जणांचा मृत्यू झालाय. ज्या कुटुंबाची हत्या करण्यात आली त्या बाबूलाल उराव यांचा परिवारच गावांमधील झालेल्या हत्यांमागे असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. हत्येच्या तीन दिवसांपूर्वी गावात एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांमधील रोष वाढला आणि संतप्त जमावानं पाच जणांना जिवंत जाळून मारुन टाकलं.

हत्येपूर्वी जमावाला भडकवण्यात आलं

पूर्णिया जिल्ह्यातील टेटगामा गावची लोकसंख्या 200 च्या आसपास आहे. आदिवासींचं गाव असलेल्या या गावात अंधविश्वासातून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला. गावचा प्रमुख नकुल उराव यानं जमावाला भडकावल्यानं हे हत्याकांड घडल्याचं स्थानिक प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. नकुल उराव याच्या सांगण्यावरुन जमावानं बाबूलाल उराव आणि त्यांच्या परिवाराची हत्या केल्याचा दावा करण्यात येतोय. गावात दोन वर्षांत सहा जणांचा मृत्यू झाला, त्यात गेल्या महिनाभरात तिघांचा मृत्यू झाला होता.

सिद्धीसाठी बळी देत असल्याचा संशय

टेटगामा गावातील बाबूलाल उराव आणि त्यांची आई कागतो देवी जादूटोणा करत असल्याची चर्चा पंचक्रोशीत होती. कुटुंबातील इतरही सदस्यांना तिनं हे शिकवल्याचा संशय स्थानिकांना होता. टेटगामा गावातील लोकांमध्ये बाबूलाल उराव यांची आई हडळ असल्याची चर्चा होती. सिद्धी मिळवण्यासाठी तिनं पतीचा बळी दिल्याचा आरोपही करण्यात येत होता. तर काही जणांच्या दाव्यानुसार कागतो देवीच्या पतीचा मृत्यू आजारपणानं झाला होता.

बाबूलालच्या कुटुंबापासून दूर राहत होते गावकरी

गावात दोन वर्षांत सहा जणांचा मृत्यू अचानक प्रकृती बिघडल्यानं झाला होता. त्यानंतर गावातील महिला बाबूलाल आणि त्यांच्या घरापासून दूर राहण्याचा सल्ला महिला आणि लहान मुलांना देत असत. पाच दिवसांपूर्वी गावातील रामदेव उराव याच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा आजारी पडला. बाबूलाल लहान मुलाचा बळी देण्याच्या प्रयत्नात असल्याची अफवा गावात पसरली आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचं सांगण्यात येतंय.

या प्रकरणात नकुल उरावसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून पुढीलव तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय


About Author

Smita Gangurde

Other Latest News