मुंबई: लाडकी बहिण योजना महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. योजनेचा हप्ता कधी येणार यावर महिलांचे विशेष लक्ष असते. आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मे महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार, असा सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरीत केला जाण्याची शक्यता आहे.
मे महिन्याचा हप्ता कधी?
लाडकी बहिण योजनेता एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला होता. मे महिन्याच्या सुरूवातीला हा हप्ता मिळाला, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लेट होईल की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, मे महिन्याचा हप्ता 15 मे नंतर कोणत्याही तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिलचा हप्ता जरी उशिरा मिळाला असला तरी मे महिन्याचा हप्ता वेळेत मिळेल, असं सांगितलं जात आहे. महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत हा हप्ता जमा होत असतो.

काही महिलांना मिळणार फक्त 500 रू.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारची भूमिका मांडली होती. त्यामध्ये त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये देण्यात येत आहेत अशी घोषणा केली. आदिती तटकरे यांच्या ट्विटनुसार या महिलांची संख्या 774148 इतकी आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळतील. उर्वरित पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
लाडकी बहिण योजनेचा निधी जमवताना सरकारची चांगलीच दमछाक होत असल्याचं चित्र आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणावेळी यावरून चांगलाच गदारोळ माजला होता. सामाजिक न्याय खात्याचा निधी वळविल्याने मंत्री संजय शिरसाटांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता देताना सरकार नेमके काय नियोजन आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.