जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल केलेला दावा फारच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महाजन यांनी खडसेंना थेट अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
खडसे यांनी एका पत्रकारच्या व्हिडिओचा हवाला देत महाजन यांचे एका आयएएस महिलेशी संबंध असल्याचा दावा केला होता. या दाव्यावरून खडसे आणि महाजन यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली होती. मात्र, महाजनांनी एक पाऊल पुढे टाकत थेट नोटीसच बजावली आहे.

खडसेंचा नेमका दावा काय?
अनिल थत्ते यांनी आपल्या व्हिडिओत दावा केला होता की गिरीश महाजन यांचे महिला आयएसएसशी संबंध आहेत. त्याविषयी गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून महाजनांना फैलावर घेण्यात आले. त्यावेळी रात्री एकनंतर तुम्ही १०० वेळा फोन करत तो सर्व रेकाॅर्ड आपल्याकडे असल्याचे शाहा यांनी सांगितले होते. यावरून खडसेंनी महाजनांचे संबंध असल्याचे साऱ्या महाराष्ट्राला माहीत असल्याचे म्हटले होते.
महाजनांचे खडसेंना प्रत्युत्तर
खडसेंच्या वक्तव्यामुळे महाजन संतापले होते. तेव्हा ते म्हटले होते की, मी जर तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करतील पण घरातील गोष्ट आहे त्यामुळे नाही बोलत. दरम्यान, महाजन यांनी खडसेंसोबत अनिल थत्ते यांना देखील अब्रु नुकसानीचे नोटीस पाठवली आहे.