मुंबई : राज्यातील रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खासकरुन राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालय यांच्यासाठी दिलासादाय निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकर, संचालक (प्रशासन) सोहम वायाळ, उपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रग्णांच्या जनजागृतीसाठी शिबिरे आयोजन करावे…
बैठकीत बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, रुग्णालयातील सध्याच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, खर्च दुप्पट-तिप्पट करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठीही तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

डायलिसिससारखी आधुनिक सेवा निर्माण करा…
दुसरीकडे रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात, असेही त्यांनी सूचित केले. डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जलदगतीने काम करावे, कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत. असे निर्देशही त्यांनी दिले. विशेष म्हणजे एक महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही मंत्री आबिटकर यांनी दिला.