उबाठाने एक पाण्याची बाटली तरी पाठवली का? देश संकट असताना ठाकरे परिवार युरोपात सुट्ट्या एन्जॉय करतोय, नरेश म्हस्केंची टिका

दहशतवादी हल्ल्यानंतर उबाठाचे खासदार संजय राऊत हिंदु-मुस्लिम करतात. तसेच पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय, पाकिस्तान आणि ‘आयएसआय’ची भाषा बोलणाऱ्या संजय राऊत याची चौकशी करायला हवी, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी यावेळी केली.

मुंबई – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून काश्मीर गेलेल्या हजारो पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या राष्ट्रीय संकटात ठाकरे परिवार परदेशात सुट्ट्या एन्जॉय करतोय, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकांना मदत करणे शिंदेंचा स्वभाव…

शिवसेनेच्या माध्यमातून बुधवारी ७५ पर्यटक विशेष विमानाने महाराष्ट्रात सुखरुप परतले. आज दोन विशेष विमानांमधून जवळपास २७० पर्यटक मुंबईत परत येतील. यात वर्धा नागपूर येथील ४५ पर्यटकांचा समावेश आहे, जे मागील दोन दिवस सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, त्यांना परत आणण्याची व्यवस्था केल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीवेळी एकनाथ शिंदे नागरिकांना मदत करण्यासाठी घटनास्थळावर पोहोचले होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार शिंदे यांच्यावर आहेत. लोकांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळेच ते श्रीनगरला गेले, असे खासदार म्हस्के म्हणाले. पण यावरुन विरोधक टिका करत आहेत. कमीत कमी वेळेच भान तरी विरोधकांना राखायला हवे होती. केवळ राजकारण करणे योग्य नाही, अशी टिका म्हस्के यांनी विरोधकांवर केली.

पाण्याची बाटली तरी पाठवली का?

पुढे बोलताना खासदार म्हस्के म्हणाले की, मराठी अस्मिता, महाराष्ट्र हिताची भाषा करणारे का नाही परदेश दौरा सोडून आले, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये मदतीसाठी गेले तुमच्या नेत्यांसारखे युरोपात थंड हवेच्या ठिकाणी नाही गेलेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. पंतप्रधान परदेश दौरा सोडून मायदेशात आले, अमित शाह पहलगाममध्ये पोहोचले. श्रीनगरमध्ये मदतीची वाट पाहणाऱ्या मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे पोहोचले तर तुम्हाला मिर्च्या का लागल्या? तेथील पर्यटकांसाठी तुम्ही पाण्याची बाटली तरी पाठवली का? असा सवाल खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News