महायुतीमधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा ? विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला

कश्मीरमध्ये अडकलेल्या 183 पर्यटकांना घेऊन विशेष विमान रात्री मुंबईत दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे हे मदतीसाठी काश्मीरला गेले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवले होते.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पर्यटकांच्या मदतीसाठी काश्मीरला गेले होते. त्यांनी विशेष विमानाने पर्यटकांना परत आणले. खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, यामध्ये श्रेयवाद नाही. जे लोक कधी जे विमानात बसले नाही, त्यांना शिंदेंनी विमानाने आणले. म्हस्केंच्या या विधानवरून त्यांच्यावर टीका होत आहे.

‘जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय, कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून पण श्रेय घ्यायचे?’ असा संतापजनक सवाल काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

पहलगाममध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. काही जखमी झाले,काही अडकले आहे. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहचत आहे याची स्पर्धा झाली. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीर वारी केली, असा संतापही वडेटीवार यांनी व्यक्त केला.

पर्यटकांवर उपकाराची भाषा?

कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे! किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

महायुतीत मदतीसाठी चढाओढ

कश्मीरमध्ये अडकलेल्या 183 पर्यटकांना घेऊन विशेष विमान रात्री मुंबईत दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे हे मदतीसाठी काश्मीरला गेले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवले होते. अजित पवारांनी देखील काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून मदतीची विनंती केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये चढाओढ असल्याचे दिसले.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News