प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेशाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/वास्तुकला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू झाली आहे. आता ही मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आता डिप्लोमा प्रवेशासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे, कारण, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इंजिनिअरिंगचे प्रवेश 28 जूनपासून सुरू होणार आहे, तर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

डिप्लोमा प्रवेशासाठी 30 जूनची मुदत

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/वास्तुकला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत मुदत होती. परंतु आता ही मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. 26 जून 2025 रोजी संध्याकाळपर्यंत तब्बल 1 लाख 50 हजार 684 विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज नोंदवले आहेत, त्यापैकी 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे.

इंजिनिअरींगसाठी अशी आहे प्रवेश प्रक्रिया

या वर्षी केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (CAP) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा विकल्प, तर चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी विकल्प अर्ज भरून केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. याची देखील नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News