मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन जीवनात भेसळीचे प्रमाण खूप वाढले आहे. म्हणजे दूधात, तेलात, पनीर तसेच अन्य पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता या भेसळीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
अन्न सुरक्षा अधिनियम नुसार कारवाई…
दरम्यान, अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज अॅनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल. असं मंत्री झिरवाळ यांनी म्हटले आहे.

अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड नाही…
दुसरीकडे रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२) (e) नुसार, ग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच, अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार, अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितले आहे.