भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज के.एल. राहुल यानं शानदार शतक झळकावून इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावणं कोणत्याही फलंदाजासाठी विशेष मानलं जातं, कारण इथे शतक करणाऱ्या खेळाडूचं नाव ‘ऑनर्स बोर्ड’ वर लिहिलं जातं आणि क्रिकेटच्या इतिहासात ते नाव अजरामर होतं.
लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड म्हणजे काय?
लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर फक्त त्याच फलंदाजाचं नाव लिहिलं जातं, ज्याने या मैदानावर कसोटीत शतक झळकावलं असतं. इंग्लंडमधील या ऐतिहासिक मैदानावर खेळणं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. प्रत्येक खेळाडूला वाटतं की, एकदा तरी आपलं नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर यावं. मात्र, हे स्वप्न साकार करण्यासाठी खेळाडूंना खूप मेहनत घ्यावी लागते.

लॉर्ड्सवर फलंदाजी करणं इतकं सोपं का नाही?
लॉर्ड्सवर फलंदाजी करणं फारच आव्हानात्मक असतं. इथल्या पिचवर थोडासा उतार (slope) असतो, ज्याला ‘लॉर्ड्स स्लोप’ म्हणून ओळखले जाते. यामुळे गोलंदाजांना अतिरिक्त स्विंग आणि मूव्हमेंट मिळते आणि फलंदाजांसाठी चेंडू वाचणं कठीण होतं. त्यात इंग्लंडचं हवामान, ढगाळ वातावरण आणि नमीमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. त्यामुळेच लॉर्ड्सवर शतक झळकावणं हे खूप मोठं यश मानलं जातं.
लॉर्ड्सवर सर्वात पहिलं शतक कोणाचं होतं?
लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वात पहिलं कसोटी शतक इंग्लंडच्या एलन स्टील या फलंदाजाने झळकावलं होतं. त्यांनी 1884 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक झळकावलं आणि ऑनर्स बोर्डवर आपलं नाव पहिल्यांदा नोंदवलं.
भारतासाठी लॉर्ड्सवर पहिलं शतक कोणाचं?
भारताकडून लॉर्ड्सवर सर्वात पहिलं शतक झळकावणारे खेळाडू म्हणजे विनू मांकड. त्यांनी 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध 184 धावांची शानदार खेळी करत हे ऐतिहासिक शतक झळकावलं होतं.