पुणे-नाशिक औद्योगिक एक्सप्रेसवे या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर, पुढील तीन वर्षांत हा एक्सप्रेसवे पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
ही योजना महाराष्ट्र सरकारची एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना असून, ती राज्यातील विकासाला चालना देणारी ठरेल. सरकारचा दावा आहे की, या एक्सप्रेसवेच्या पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक प्रवासाचा कालावधी फक्त 2.5 ते 3 तासांवर येईल, जो सध्या 5 तासांपेक्षा जास्त आहे. यामुळे उद्योग, वाहतूक आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.

औद्योगिक कॉरिडॉरला चालना
पुणे-नाशिक एक्सप्रेसवे या दोन्ही शहरांना जोडण्याबरोबरच एक भक्कम औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करेल. यामुळे अनेक लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. या प्रस्तावित मार्गावर अनेक तीर्थक्षेत्रे देखील जोडली जाणार आहेत. दादाजी भूसे यांनी हे देखील सांगितले की, मार्गाच्या तांत्रिक बाबींवर सध्या काम सुरू आहे.
मागील वर्षीच मिळाली होती प्रकल्पाला मंजुरी
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच सरकारने पुणे-नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे ला मंजुरी दिली होती. हा महामार्ग सूरत-चेन्नई एक्सप्रेसवे शी जोडला जाणार आहे, ज्यामुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर इतर राज्यांनाही थेट फायदा होईल.
हा एक्सप्रेसवे सुमारे 133 किलोमीटर लांब असणार आहे आणि 3 वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
अहिल्यानगर आणि नाशिक ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे असून, या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून या भागात औद्योगिक घडामोडींना नवसंजीवनी मिळेल.