इटलीने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. इटली क्रिकेट संघ आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारा इटली आता १५ वा संघ बनला आहे, या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील. इटलीची पात्रता ही क्रिकेटचा खेळ जगभरात आपला ठसा उमटवत असल्याचा पुरावा आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की इटलीमध्ये क्रिकेटची सुरुवात कधी झाली आणि या संघाने पहिल्या विश्वचषक स्पर्धेत कसा प्रवेश केला?
इटलीमध्ये क्रिकेटची सुरुवात कधी झाली?
इटालियन क्रिकेट फेडरेशनची स्थापना १९८० मध्ये झाली, त्यानंतर चार वर्षांनी संघाला आयसीसीचे सदस्यत्व मिळाले. इटली क्रिकेट संघाने आपला पहिला अधिकृत सामना १९८४ मध्ये खेळला, त्या काळात संघ लंडनमधील स्थानिक क्लबसोबत खेळायचा. इटलीचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९८९ मध्ये डेन्मार्कविरुद्ध झाला होता, जो अनिर्णित राहिला. अखेर, १९९५ मध्ये, पहिला अधिकृत सामना खेळल्यानंतर जवळजवळ ११ वर्षांनी, इटली आयसीसीचा सहयोगी सदस्य बनला.

इटली टी-२० विश्वचषकासाठी कसा पात्र झालास?
मागील टी-२० विश्वचषकातील टॉप-८ संघांना २०२६ च्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली, तर चार संघांना रँकिंगच्या आधारे विश्वचषकात प्रवेश मिळाला. तर उर्वरित ८ संघांना प्रादेशिक पात्रता फेरीतून विश्वचषक स्पर्धेत आपले स्थान निश्चित करावे लागेल. इटलीनेही पात्रता फेरीतून विश्वचषकात प्रवेश केला आहे.
युरोप पात्रता फेरीत एकूण ३० संघांनी भाग घेतला होता, त्यांना प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले होते. गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवून, इटलीने युरोपियन प्रादेशिक पात्रता फेरीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला, जिथे पाचपैकी फक्त दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. या टप्प्यात, इटलीचा नेदरलँड्सकडून पराभव झाला, तरीही, इटली नेट रन-रेटच्या बाबतीत जर्सी संघापेक्षा पुढे राहिला, ज्यामुळे त्यांना २०२६ च्या टी-२० विश्वचषकात प्रवेश मिळाला.