नवी मुंबई- मुंबईच्या विकासाला नवी गती देणारं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठीची एप्रिल 2025ची डेडलाईनही उलटून गेली त्यामुळं हे विमानतळ नेमकं कधी सुरू होणार?, असा प्रश्न विचारला जातोय. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करत कधीपर्यंत विमानतळ सुरु होईल याची तारीख जाहीर केली.
शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विमानतळाच्या कामाची पाहणी केली. रनवेपासून ते टर्मिनल बिल्डिंगपर्यंतच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर आता सप्टेंबर 2025ची नवी डेडलाईन मिळालीय. रनवे सुसज्ज आहे, टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण झालंय.

नवी मुंबई विमानतळ गेमचेंजर
नवी मुंबई विमानतळ अर्थातच मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी मोठं गेम चेंजर असणार आहे.
1.क्षेत्रफळ – 1,160 हेक्टर
2. दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करण्याची क्षमता
3. एकाच वेळी 350 विमानांची पार्किंग करता येणार
4. 2.5 टन मालवाहतुकीची क्षमता असेल
5. चार टर्मिनल्सची सुविधा असेल
6. दोन समांतर धावपट्ट्या आणि प्रवाशांसाठी दोन समांतर टॅक्सी-वे असतील
7. कोस्टल रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेनशी थेट जोडणी असेल
विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव?
या विमानतळामुळे या भागातल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबतचं आश्वासन दिलं. उद्घाटनाआधीच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा गाजतोय. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी विविध संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे या मागणीच्या पूर्ततेकडे लक्ष असेल.
सप्टेंबरमध्ये विमानतळ कार्यान्वित होणार -मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, सप्टेंबर 2025 मध्ये हे विमानतळ प्रवासी सेवेसाठी कार्यान्वित होणार असून त्याआधी उर्वरित 6% काम पूर्ण करायचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 94% काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता असेल.
या विमानतळावर जगातील सर्वात वेगवान ‘बॅग क्लेम सिस्टीम’ विकसित केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले.
महत्त्वाचे टप्पे:
1. 10 जून 2022 रोजी संपूर्ण 1160 हेक्टर जागेवर 100% प्रवेश व मार्गाधिकार सिडकोमार्फत NMIALला हस्तांतरित
2. सिडकोकडून सुमारे 2000 कोटींच्या पुनर्वसन आणि भूसंपादनाचे काम पूर्ण
3. 29 मार्च 2022 रोजी NMIAL ने वित्तीय ताळेबंदी साध्य केली; SBI कडून 12,770 कोटींचा निधी मंजूर
4. सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास
5.उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण
6.. 11 ऑक्टोबर 2024 रोजी C-295 विमानाचे उदघाटन लँडिंग, SU-30 ने 2 लो पास
7. 29 डिसेंबर 2024 रोजी इंडिगो A320 विमानाने पहिले व्यावसायिक लँडिंग
8. 30 जून 2025 पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती
सध्या या प्रकल्पावर 13,000 कर्मचारी कार्यरत असून उर्वरित काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.