हिंगोली: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, त्यानंतर मंत्रिमंडळांचा विस्तार देखील झाला. मंत्र्यांचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरला. पुढे आगामी काळात खात्यांचे मंत्री बदलले जातील, नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच जाहीर केलं होतं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर मोठं भाष्य केलं आहे. दादांनी नवे मंत्री कधी होतील, त्याची तारीख सांगून टाकली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार हिंगोलीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं. “अडीच वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असा शब्द दिलेला आहे. तो शब्द मी पाळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका,” असं अजित पवार यांनी म्हटलंय. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही आमदारांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.

2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) यांनी एकत्र मिळून लढवली. आता तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशीच चढाओढ पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांतर्गतही मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय. यामुळे अडीच वर्षांना नव्या मंत्र्यांना संधी देताना पुन्हा पेच प्रसंग उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांनी आधीच दिले होते संकेत
याबाबत सरकार स्थापन झाले त्यावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते. मंत्र्यांची कार्यक्षमता विचारात घेऊनच त्यांचे मंत्रीपद राहणार की जाणार याचा निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सुरूवातीलाच स्पष्ट केलं होते. सध्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली होती, त्यांना पुढच्या अडीच वर्षांनी खुर्ची खाली करावी लागणार, असे त्यावेळी ठरले होते. म्हणजेच या पुढच्या अडीच वर्षांनी नव्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्याचा फॉर्म्यूला समोर ठेवला होता. याच फॉर्म्यूलाचा अजित पावर यांनी हिंगोलीत नव्याने उल्लेख केला आहे. मी नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असं असं मी म्हटलं होतं, तो शब्द मी पाळणार, असं अजित पवार म्हणाले आहेत.
नव्याने मंत्रिपद देत असताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची अधिक शक्यता आहे. त्यामध्ये 3 किंवा त्याहून अधिक काळ आमदार राहिलेल्यांना संधी मिळण्याची अधित शक्यता आहे असं बोललं जात आहे.