Devendra Fadnavis : राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तरी सुद्धा ४ महिन्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा (Varsha) बंगल्यावर राहायला गेले नव्हते.
यावरून विरोधकांनी बरीच टिका केली. मात्र तब्बल ४ महिन्यानंतर आज साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे.

अमृता फडणवीसांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
दरम्यान, वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशानंतर याबाबत अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गृहप्रवेशाची माहिती दिली आहे. “सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे”. अशी पोस्ट अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर केली आहे.
सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला.
आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६०… pic.twitter.com/l03aLKE2Ak— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 30, 2025
वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्यांची शिंगे पुरलेत…
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीवरुन कामाख्या देवीची रेड्यांची शिंगे वर्षा बंगल्याच्या आवारत पुरले आहेत. त्यामुळं कुठलाही दुसरा मुख्यमंत्री येथे टिकून नये, कुठलाही व्यक्ती येथे राहू नये म्हणून एकनाथ शिंदेंनी रेड्यांची शिंगे पुरले आहेत. हे देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे, म्हणून ते तिथे राहयला जात नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावरुन बरेच राजकारण रंगले होते. आरोप-प्रत्यारोप झाले.
वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. हे आपणाला जायला मिळावे, म्हणून लोकं मरत असतात. पण मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जात का नाहीत? असा प्रश्न विरोधकांनी विचारत मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. दुसरीकडे आमची मुलगी दिविजा हिची दहावीची परीक्षा आहे. आणि तिला एकाच ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आम्ही सागर बंगल्यावर थांबलो होतो. या परीक्षेमुळे वर्षा बंगल्यावर राहायला उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.