‘जातीनिहाय जनगणनेचे श्रेय पंतप्रधान मोदी घेणार नाहीत’, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

ठाणे :  जातीनिहाय जनगणना करण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच अनेक वर्षांपासून यासाठी मागणी करण्यात येत होती मात्र काँग्रेसने ती पूर्ण केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मागणी पूर्ण केली मात्र ते याचे श्रेय घेणार नाहीत. ते याचे श्रेय 140 कोटी भारतीयांन देतील, असे शिंदे म्हणाले.

शिवसेना, या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करते तसेच इतका मोठा आणि कठीण निर्णय घेण्यासाठी धाडस लागते आणि पंतप्रधान मोदींनी नेहमीच ते धाडस दाखवले आहे, असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे वृत्त येऊन धडकले. एकाअर्थी ही मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली असं म्हणावं लागेल, असे देखील शिंदेंनी सांगितले.

काँग्रेसला सहन होत नाही…

‘संविधान बचाव’च्या ऊठसूट बाता मारणाऱ्या काँग्रेसची अवस्था मात्र आता ‘सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी होणार आहे. जातनिहाय जनगणनेची तोंडदेखली मागणी करणाऱ्या या पक्षाने स्वत:च्या राजवटीत मात्र हा निर्णय घेण्याची तसदी घेतली नाही. किंबहुना, आपली व्होटबँक सांभाळण्याच्या स्वार्थापोटी अशी जनगणना त्यांनी होऊच दिली नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

दूध का दूध होईल

जातनिहाय जनगणनेमुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, आणि या देशाचं वस्त्र नेमकं कुठल्या धाग्यांनी विणलं गेलं आहे, हे स्पष्टपणे कळून येईल. असे निर्णय घ्यायला धाडस लागतं. पण मोदीजींनी मात्र निवडणुका, मतदान वगैरे पर्वा न करता सामाजिक न्यायासाठी कठोर निर्णयांचा धडाका लावला. 370 कलम, नारी शक्ती वंदन, वक्फ बोर्ड सुधारणा कायद्या पाठोपाठ आज कास्ट सेन्ससचा निर्णय झाला.शिवसेनेतर्फे आम्ही मोदी सरकारचं मुक्त कंठानं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या निर्णयाला समर्थन देतो,असे देखील शिंदेंनी सांगितले.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News