मुंबई : केंद्र सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सप्टेंबरपासून जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत होती. त्यामुळे सरकारच्या निर्णयानंतर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? ते विजय विडेट्टीवार यांनी जाहीर केले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, ‘देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. दलित, OBC तसेच मागास समाजांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे हाच राहुल गांधींच्या मागणी मागचा हेतू होता.

निर्णय निवडणुकी पुरता मर्यादीत?
विजय वडेट्टीवार यांनी जातीनिहाय जनगणनेची अचानक घोषणा करण्यामागे संशय देखील व्यक्त केला आहे. सत्ताधारी पक्ष आधी जातीनिहाय जनगणनेला विरोध करत होता मात्र आज त्यांनी अचनाक निर्णय घेतलाय त्यामुळे बिहारच्या निवडणुकीसाठी ही घोषणा नाही ना? असे म्हणत केवळ निवडणुकीपुरती ही घोषणा मर्यादित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हक्काची संधीची मोजणी
जनगणना निर्णायक ठरू शकते – पण केवळ तेव्हाच, जेव्हा ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण पारदर्शकतेने राबवली जाईल.ही घोषणा केवळ राजकीय स्टंट न राहता, सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरावे. ही केवळ आकड्यांची मोजणी नाहीतर प्रत्येक घटकाच्या हक्काची, संधीची मोजणी आहे, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.