आनंदाची बातमी! मान्सून निकोबार बेटांवर दाखल, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

उन्हाळा संपत असताना आता सर्वांना मान्सून पावसाच्या आगमनाची ओढ लागली आहे. सध्या मान्सून अंदमान परिसरात आला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सूनचा पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

उन्हाळा आता जवळपास संपत आला आहे. अशा परिस्थितीत सर्वांना ओढ लागली आहे मान्सून पावसाची. मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी एन्ट्री घेणार? सध्या काय स्थिती? असे प्रश्न विचारले जात आहेत. आता मान्सून बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मान्सूनबाबत  गूड न्यूज समोर आली आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये दाखल होणार आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे.  केरळात मान्सून 27 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

गेल्या 17 वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सून नियोजित तारखेपूर्वीच केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, केरळ किनारपट्टीवर मान्सून 27 मे 2025 रोजी दाखल होईल आणि त्यानंतर मान्सून कर्नाटक आणि पुढे महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणार आहे. हवामान खात्याच्या मते 15 किंवा 16 मेपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. यानंतर तो दक्षिण अरबी समुद्र, श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान बेटांवर पोहोचेल. यंदा अनुकूल वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास जलद होत आहे.

विशेष म्हणजे यंदा केरळात मान्सून वेळेआधी दाखल होत आहे. यंदा मान्सून केरळमध्ये पाच दिवस आधी म्हणजेच 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः 1 जून हा केरळमधील मान्सून आगमनाचा दिवस मानला जातो, परंतु यंदा अनुकूल हवामान परिस्थितीमुळे तो लवकर पोहोचेल.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

महाराष्ट्रात मान्सून साधारणपणे 9 ते 11 जून दरम्यान दाखल होतो. यंदा केरळमध्ये लवकर आगमन होत असल्याने दक्षिण कोकणात 4 ते 5 जून आणि मुंबई-पुण्यात 6 ते 7 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा ला निना प्रभावामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते. यंदा सरासरीच्या 103-105 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा शेतीचा खरीप हंगाम देखील लवकर चालू होईल. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, जिथे पावसावर शेती अवलंबून आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News