Protein Powder : सध्याच्या काळात फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाइलचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. लोक जिमला जातात, व्यायाम करतात आणि चांगल्या आहारावर लक्ष केंद्रित करतात. अशातच, प्रोटीन पावडरचा वापरही आता सर्वसामान्य झाला आहे.
मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो, तो म्हणजे प्रोटीन पावडर दुधासोबत घ्यावे की पाण्यासोबत? या प्रश्नाचं थेट उत्तर देणे थोडे कठीण आहे, कारण दूध आणि पाणी या दोन्हींमध्येही त्यांचे स्वतःचे फायदे आहेत. अशा स्थितीत चला तर मग जाणून घेऊया, प्रोटीन पावडर दुधासोबत घेणे चांगले की पाण्यासोबत?

दुधासोबत प्रोटीन पावडर घेण्याचे फायदे
अधिक कॅलरीज आणि पोषण
जेव्हा तुम्ही प्रोटीन पावडर दुधात मिसळून घेता,तेव्हा तुम्हाला दूधामधून अतिरिक्त कॅलरी, प्रथिने, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात.
हा पर्याय कोणासाठी उपयुक्त ठरतो?
जे वजन वाढवू इच्छितात,
जे मसल (स्नायूंचं प्रमाण) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बराचवेळ भुक लागत नाही
दुधात चरबी आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने पोट बराच काळ भरलेले ठेवते. ज्यांना जास्त वेळ भूक न लागण्याचा पर्याय हवा आहे त्यांच्यासाठी ही पद्धत चांगली आहे.
चव वाढवते
दुधासोबत प्रोटीन शेक घेतले तर, त्याची चवही चांगली लागते. विशेषतः ते शेक चॉकलेट किंवा व्हॅनिला फ्लेवरमध्ये असेल तर. दूध प्रोटीन शेकला एक गोडसर, क्रीमी टेक्चर देते, ज्यामुळे ते सहज आणि आनंदाने प्यायला जाते. म्हणूनच अनेक लोक दूधासोबत प्रोटीन घेणे पसंत करतात.
अधिक पोषक घटक मिळतात
दुधामुळे तुम्हाला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बी१२ सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात, जे हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असतात.
पाण्यासोबत प्रोटीन पावडर घेण्याचे फायदे
कमी कॅलरीज, जलद पचन होते
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा कमी कॅलरीयुक्त आहार घेणाऱ्यांसाठी, पाण्यासोबत प्रोटीन पावडर घेणे चांगले आहे. त्यात अतिरिक्त कॅलरीज नसतात आणि ते शरीरात लवकर पचते.
जलद शोषण
वर्कआउटनंतर जेव्हा शरीराला त्वरित प्रोटीनची गरज असते, तेव्हा पाण्यासोबत घेतलेले प्रोटीन शेक लवकर पचते आणि शरीरात लगेच शोषला जातो.
म्हणूनच पोस्ट-वर्कआउट शेकसाठी पाण्याबरोबर प्रोटीन घेणं सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
हे शरीराच्या रिकव्हरी प्रोसेसला गती देते आणि स्नायूंना लवकर पोषण मिळवून देते.
पचायला हलके
काही लोकांना दुधामुळे गॅस किंवा पोटफुगीची समस्या उद्भवू शकते. अशा लोकांसाठी, पाण्यासोबत प्रथिने घेणे अधिक सोयीस्कर आणि हलके असते.
ट्रॅव्हल फ्रेंडली
जेव्हा तुम्ही प्रवासात असता तेव्हा पाण्याच्या साह्याने प्रोटीन शेक करणे सोपे असते. यासाठी दूध सोबत ठेवण्याची कटकट नसते.
तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?
हे पूर्णपणे तुमच्या फिटनेस, टार्गेटवर आणि शरीराच्या गरजांवर अवलंबून असते.
दोघांना एकत्र करून घेणे योग्य आहे का?
काही लोक प्रोटीन पावडर अर्ध दूध आणि अर्ध पाणी मिसळून घेतात.
हा उपाय त्यांच्यासाठी चांगला आहे जे चव आणि पचन यामध्ये समतोल राखू इच्छितात. यामुळे तुम्हाला दुधाचे काही प्रमाणात पोषण मिळते आणि पाण्याचे हलकेपणा देखील टिकून राहतो.
लक्षात ठेवा, दूध किंवा पाण्यात मिसळून प्रोटीन पावडर घेणे हे पूर्णपणे तुमच्या टार्गेटवर आणि शरीराच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल किंवा स्नायू वाढवायचे असतील तर दूध हा एक चांगला पर्याय आहे. त्याच वेळी, जर तुमचे ध्येय वजन कमी करणे किंवा जलद पचन करणे असेल तर ते पाण्यासोबत घेणे चांगले.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)