अकरावी प्रवेशाबाबत मोठी बातमी; यंदा 16 लाख 76 हजार जागा उपलब्ध होणार!

उद्या दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर पालकांची अकरावी प्रवेशासाठी धावाधाव सुरू होते. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शिक्षण विभाग लवकरच शिक्षण विभाग पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दहावीचे निकाल जाहीर होताच पालकांची आणि विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी धावाधाव सुरू होते. कुठे प्रवेश घ्यायचा, शाखा कोणती निवडायची, कोणत्या महाविद्यालयात किती अनुदानित जागा आहेत, याबाबतचा शोध सुरू होतो. आता याच अनुषंगाने एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अकरावी प्रवेशासाठी 16 लाखांहून अधिक जागा

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा तब्बल १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीपर्यंत चालणारी अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट शिक्षण संचालनालयाने ठेवलं आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकता, गती आणि सोयीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रणालीमुळे विद्यार्थी आणि पालकांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा मिळते, त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात. प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार टाळता येतात आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळते. पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळवणे सोपे होते आणि संपूर्ण प्रक्रिया संगणकीकरणामुळे अधिक विश्वासार्ह ठरते. शाळा, कॉलेज आणि शासन यांच्यातील समन्वयही सुलभ होतो. त्यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरते.

दहावीचा निकाल कधी?

राज्य शिक्षण मंडळाद्वारे दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 12 मे रोजी जाहीर होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तरी शिक्षण मंडळ याबाबतची तारीख पत्रकार परिषद घेत अधिकृत रित्या जाहीर करणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत तारीख लवकरच समोर येईल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News