पुणे : निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन ४३ आपला दवाखान्याच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुण्यात रुग्णालयात वेळेवर उपचार मिळणार…
जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेचा जीव गमवावा लागला, या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य सरकार एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून लवकरच रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ राज्यात लागू करणार आहे. राज्य सरकार रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.

नेमकं आरोग्य मंत्री काय म्हणाले?
आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालय आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे.