उरलेल्या चहापत्तीचे आहेत जबरदस्त फायदे! जाणून घ्या….

आपल्यापैकी अनेकजण एकदा का चहा तयार केला की मग उरलेली चहापत्ती फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच उरलेल्या चहापत्तीचे फायदे जाणून घ्या.

बहुतेक लोकांची सकाळची सुरुवात चहाने होते. दररोज घरी बनवलेला चहा गाळल्यानंतर, उरलेली चहाची पावडर फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की उरलेल्या चहाच्या पत्तीमध्येही अनेक गुणधर्म असतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ते त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. आज आपण उरलेल्या चहापत्तीच्या अनोख्या आणि उपयुक्त उपयोगांबद्दल जाणून घेणार आहोत.

पायांचा दुर्गंध दूर करण्यासाठी

बराच वेळ शूज घातल्यानंतर पायांना वास येऊ लागतो. उन्हाळ्यात ही समस्या आणखी वाढते. पण उरलेल्या चहापत्तीचा वापर करून तुम्ही या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता. सर्वप्रथम, चहापत्ती पाण्यात टाका नंतर हे पाणी काही काळ उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर ते एका टबमध्ये ओता. मग तुमचे पाय काही वेळ त्यात बुडवून ठेवा. असे केल्याने पायाची दुर्गंधी कमी होते.

चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी वापरा

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता. चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला दुरुस्त करण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच, चहापत्तीमध्ये टॅनिन नावाचे एक रसायन असते, जे त्वचेतील रक्तवाहिन्या कडक करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी दिसतात. थोडीशी चहापत्ती उकळत्या पाण्यात 5-10 मिनिटे भिजवून घ्या. मग या पाण्याला थंड होऊ द्या आणि त्यात थोडेसे बेसन, मध आणि दही मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावरील डागांवर लावा आणि 15-20 मिनिटे सुकवू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

गुडघे आणि कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी स्क्रब बनवा

चहापत्तीचा वापर गुडघा आणि कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. चहापत्तीमध्ये टॅनिंग आणि काळेपणा कमी करण्याचे गुणधर्म असतात. उरलेल्या चहापत्तीला वाळवून, बारीक करून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट गुडघा आणि कोपरांच्या काळ्या भागावर 10-15 मिनिटे लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्वचा कोरडी करा आणि मॉइश्चरायझर लावा.

मृत पेशी निघून जातील

चहापत्ती त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी मदत करतात. चहापत्तीचा स्क्रब बनवून तो चेहऱ्यास किंवा टाळूवर लावल्यास त्वचेतील मृत पेशी निघून जातात. चहा केल्यावर उरलेली चहा पावडर किंवा चहापत्ती पाण्याने स्वच्छ धुवा. ते गाळून त्यात एक चमचा मध किंवा तेल घाला हे मिश्रण चेहऱ्यावर किंवा टाळूवर एक ते दीड मिनिटे चोळा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. चहापत्तीमध्ये टॅनिन असतात, ज्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात.

केसांची चमक वाढवते

उरलेल्या चहापत्तीचा वापर नैसर्गिक कंडिशनर म्हणून करता येतो. 1 कप पाण्यात 2-3 चमचे चहापत्ती घेऊन 10-15 मिनिटे उकळा. चहापत्तीचे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेले पाणी केसांना आणि टाळूला व्यवस्थित लावा. 30 मिनिटे पाण्याने केस भिजू द्या. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News