मुंबई: लाडक्या बहिण योजनेचा येता हप्ता एप्रिलच्या 30 तारखेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला वितरीत केला जाणार आहे. पात्र व्यक्तींच्या खात्यामध्ये 1500 रूपये जमा केला जाणार आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रूपयांचं नेमकं काय होणार, असा सवाल मात्र सातत्याने विचारला जात आहे. त्यावर आता मंत्री नरहरी झिरवाळांच्या एका विधानाने हत्पा मिळणार की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे.
काय म्हटले नरहरी झिरवाळ?
‘लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत, असा दावा करत होते. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयांवर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे.’ जळगावात माध्यमांसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी हे विधान केले आहे.

1,500 रूपयांवरच समाधान?
राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची 1500 रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार? त्याची वाट पाहत आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. 2100 रुपये देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या या विधानामुळे लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या मनात अनेक सवाल आणि संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे महायुतीची लाडकी बहिण योजना निवडणुकीचा जुमला होती का, असा सवाल निर्माण केला जात आहे. अलीकडे सरकारने पात्र लाभार्थी महिलांची संख्या देखील अनेक कारणे देत घटवली, या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. महिला आणि बालविकास खाते देखील 2100 रूपयांच्या बाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे.