मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. काही ठिकाणी दर्जाहीन औषधांचा पुरवठा देखील झाला होता. त्यानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाने आता गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर या विभागाने शुक्रवारी राज्यातील या रूग्णालयांना औषध पुरवताना विशेष काळजी घेणार असल्याचं सागितलं आहे. शासनाच्या प्रयोगशाळेत पुरवठा करण्याआधी औषधांची तपसाणी केली जाणार आहे. तशी परवानगी आरोग्य विभागाने दिली आहे.
प्रयोगशाळांत होणार तपासणी
आरोग्य विभागाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. या ठिकाणी औषधांची गुणवत्ता तपासणी केली जाईल. तशी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी खासगी प्रयोगशाळांवर आता अवलंबून रहावे लागणार नाही. राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून 2023-24 मध्ये 12,767 प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी 1,884 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 1772 नमुने वापरण्यास योग्य होते, तर 3 नमुने अयोग्य ठरले होते.

अशी पार पडणार प्रक्रिया
आरोग्य विभागाच्या काय सुचना? यापुढे औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमांनुसार पार पाडली जावी. सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्याप्रमाणे औषधांच्या नोंदी कराव्यात. ई-औषध प्रणालीचा नोंदी करण्यासाठी वापर करावा. 24 ते 48 तासांमध्ये अशा प्रकारच्या नोंदी करणे अपेक्षित आहेत.
खरेदी केलेल्या सर्व औषधांचे बॅचनिहाय नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पुरवठादार कंपनी आणि प्रयोगशाळा यांचा कोणताही संपर्क होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक औषधाचा प्रत्येक समूह क्रमांक तपासणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. याकरिकता त्रयस्थ प्रयोगशाळा अथवा खरेदी प्राधिकरणाने निर्धारीत केलेल्या प्रयोगशाळेत तपासणी केले जाणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.