मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता चांगलाच रखडला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतिक्षा काही संपताना दिसत नाही. सुरूवातीला एप्रिल महिन्याचे 1500 रूपये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होतील, असं सांगितलं जात होतं. पण, हा दावा फेल ठरला. आता मे महिन्याचा पहिला दिवसही संपला. त्यामुळे महिलांमध्ये आता संभ्रम वाढत चालला आहे. त्यामध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी हा संभ्रम अधिक वाढवला आहे.
काय म्हटल्या आदिती तटकरे?
‘लाडकी बहिण योजना महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे’ असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार असं दिसतं आहे. त्यामुळे ‘2100 राहुद्या 1500 तरी द्या’ असा सुर आता राज्यातील लाडक्या बहिणींमधून ऐकायला मिळत आहे.

नेमका कधी येईल हप्ता?
काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा हप्ता मे महिन्याच्या चालू पहिल्या आठवड्यात जमा होण्याची अधिक शक्यता आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी, सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.
सरकारच्या समोर आर्थिक अडचणी
संबंधित योजना चालवणे फडणवीस सरकारसाठी जिकीरीचे बनल्याचे सांगितले जात आहे. कारण, लाडकी बहिण योजनेला लागणाऱ्या निधीमुळे इतर बऱ्याच विकासकामांना सध्या स्थगिती मिळाल्याचे चित्र आहे. शिवाय बऱ्याच लोकोपयोगी योजनांच्या निधीला देखील कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार काही प्रमाणात पेचात सापडल्याचे बोलले जाते. तरीही सरकारमधील वरिष्ठ नेते काहीही करून ही योजना सुरू ठेवायची या मनस्थितीत दिसत आहेत.